अग्निपथ योजनेवरून देशभर गदारोळ सुरु आहे. अनेक राज्यांत आंदोलन सुरु असून रेल्वे बोग्या जाळल्या जात आहेत. सिकंदराबादमध्ये गोळीबार झाला आहे. आंदोलनाचा हा वणवा पेटला असतांना लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी अग्निपथची भरती प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे तर एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी येत्या शुक्रवारपासून म्हणजेच 24 जूनपासून भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.
जनरल मनोज पांडे म्हणाले की, लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. पुढील 2 दिवसात http://joinindianarmy.nic.in वर अधिसूचना जारी केली जाईल. त्यानंतर सैन्य भरतीचा सविस्तर कार्यक्रम दिला जाईल. सैन्यदलात वयात एकवेळ सवलत देण्याचा शासन निर्णय प्राप्त झाला आहे. त्यानुसार भरती प्रक्रिया जाहीर केली जाईल. लष्करप्रमुखांनी तरुणांना 'अग्निवार' म्हणून भारतीय सैन्यात सामील होण्याच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
अनेक तरुणांना संधी
लष्करप्रमुखांनी एका निवेदनात म्हटले आहे की, वयोमर्यादा वाढवण्याच्या निर्णयामुळे आमच्या अनेक तरुण, उत्साही आणि देशभक्त तरुणांना संधी मिळेल. जे कोविड-19 असूनही भरती मेळाव्यात सहभागी होण्याची तयारी करत होते.
नौदल प्रमुख एँडमिरल हरी कुमार यांनी अग्निपथ योजनेचे वर्णन परिवर्तनाची योजना असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आम्ही पूर्वीपेक्षा तीनपट किंवा चार पट अधिक भरती करणार आहोत. अग्निपथ योजनेत अग्निवीरांचे व्यक्तिमत्त्व विकसित होऊ शकते. 4 वर्षांनंतर त्यांना राहायचे की नाही हे ठरवता येईल. देशात राष्ट्रवादी विचार रुजवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे हरी कुमार यांनी सांगितले.
वयोमर्यादा २१ वरून २३ वर्षे
अग्निपथ योजनेला विरोध होत असताना केंद्र सरकारने गुरुवारी उमेदवारांची वयोमर्यादा २१ वरून २३ वर्षे केली आहे. यंदा केवळ सैन्यात भरतीसाठी ही सूट देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अग्निपथ योजनेंतर्गत सरकारने सैन्यात भरतीसाठी वय 17 ते 21 वर्षे निश्चित केले होते.