अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये अदानींवर फसवणुकीचा आरोप करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 250 दशलक्ष डॉलर्सची लाच देण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. गौतम अदानीसह 8 जणांवर अब्जावधी डॉलर्सची फसवणूक आणि लाच घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टाच्या सुनावणीत अदानींवर हा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाचं खंडन करत अदानी समुहाकडून निवेदन जारी करण्यात आलं आहे.
थोडक्यात
न्यूयॉर्कमध्ये अदानींवर फसवणुकीचा आरोप
सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 250 दशलक्ष डॉलर्सची लाच देण्याचा आरोप
अदानी समुहाकडून निवदेन जारी
निवेदनात भ्रष्टाचाराच्या सर्व आरोपांचं खंडन
मुंबई शेअर बाजारात आज व्यवहारांची सुरुवातच मोठ्या आर्थिक भूकंपानं झाली. तिकडे अमेरिकेत गौतम अदानींवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि इकडे मुंबईत शेअर बाजार गडगडला. आरोप झालेली रक्कम थोडीथोडकी नसून तब्बल २ हजार कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे भारतात गुंतवणूकदारांचे पहिल्या तासाभरात अडीच लाख कोटींहून जास्त नुकसान झालं. त्यापाठोपाठ भारताच्या राजकीय वर्तुळात या मुद्द्यावरून प्रतिक्रिया उमटू लागल्या. विरोधी पक्षांनी अदानींवर टीका करतानाच भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केलं. राहुल गांधींनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जाहीररीत्या टीका केली. या प्रकरणावर आता अदाणी समूहाकडून निवेदन जारी करण्यात आलं आहे.
काय आहे अदानींच्या निवेदनात?
अदानी समूहाकडून जारी करण्यात आलेल्या स्पष्टीकरणाच्या निवेदनात भ्रष्टाचाराच्या सर्व आरोपांचं खंडन करण्यात आलं आहे. “अमेरिकेच्या विधी विभागाकडून ‘अदानी ग्रीन्स’च्या संचालकांवर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असून आम्ही ते सर्व आरोप फेटाळत आहोत”, असं या निवेदनात सुरुवातीलाच नमूद करण्यात आलं आहे.