आज (29 जून) आषाढी एकादशी आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मानाचा वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी गावातील भाउसाहेब मोहनीराज काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे या शेतकरी दाम्पत्याला पुजेचा मान मिळाला.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जनसेवेचा जो वसा माझ्या हाती पांडुरंगाने सोपवला आहे तो असाच पुढे नेण्याचे बळ मला मिळावे एवढीच इच्छा मनोमन व्यक्त केली. राज्यातील बळीराजा सुखी समाधानी व्हावा हे आणि एवढेच मागणे मी विठुरायाच्या चरणी मागितले. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल रखुमाईची विधीवत शासकीय महापूजा करण्याचे भाग्य मला मिळाले. सलग दुसऱ्या वर्षी सावळ्या विठुरायाचे मनोहर रूप डोळ्यात साठवून ठेवत त्याची मनोभावे आराधना करण्याची संधी मला मिळाली, मी भाग्यवान समजतो. प्रत्येक राज्यातल्या माणसाला चांगले दिवस यावेत. असे मुख्यमंत्री म्हणाले.