Aaditya Thackeray Press Conference : राज्य सरकारच्या 'गाजर' बजेटमध्ये मुंबईला काहीच मिळालं नाही. केंद्र सरकारच्या 'भोपळा' बजेटमध्ये महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही. इतक्या पैशांची उधळपट्टी कशासाठी सुरु आहे? याचं उत्तर आम्हाला मुंबई महापालिकेनं देणं गरजेचं आहे. कारण आम्ही याच्या खोलात जाणार आहोत. या नोव्हेंबरमध्ये आमचं सरकार बसणार आहे. आमचं सरकार बसल्यानंतर ही सर्व कामे आम्ही स्टॉप पेमेंट करणार. त्यानंतर मिंधे सरकारमधील मंत्री आणि अधिकाऱ्यांची आम्ही चौकशी करू. आम्ही त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय थांबणार नाही. कारण ही मुंबईची लूट सुरु आहे. दुसरीकडे रस्त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची लूट सुर आहे, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे.
आदित्य ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, मागच्या वर्षी एकही काम पूर्ण न होता, यावर्षी पुन्हा एकदा ६ हजार कोटीचे वेगवेगळे टेंडर काढले आहेत. याच्यातही पाच आवडते मित्र घेतले आहेत. सरकार या पाच ठेकेदारांना ६ हजार कोटींची मदनिधी जाहीर करत आहे. कारण हे खिसे भरण्याचं काम चालू आहे. मागच्या वर्षीच्या टेंडरमधून किती कामं पूर्ण झालेली आहेत. किती कामं चालू झाली आहेत, किती कामं ५० टक्के तरी झाली आहेत, याबाबत जाहीरपणे माहिती द्या असं मी मुंबई महापालिकेला पत्र लिहून सांगितलं आहे.
महापालिकेच्या ब्लॅकलिस्ट यादीकडे कुणी गांभीर्यांने पाहायचं की नाही? या वर्षीच्या टेंडरमध्ये ब्लॅकलिस्ट झालेल्या ठेकेदाराला मोठं काम दिलेलं आहे. मुंबई महापालिका एमएमआरडीएला पैसे देते. ही महापालिका ठेकेदारांवरही पैशाची उधळपट्टी करत आहे. पण त्यांच्याकडे स्वत:च्या कामगारासाठी आणि बेस्टसाठी पैसे नाही आहेत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.