Aaditya Thackeray Press Conference : नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. या परीक्षेचे प्रकरण थेट कोर्टात गेलं असून नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केलीय. दरम्यान, महाराष्ट्रात सीईटी परीक्षेचाही मोठा गोंधळ झाला असल्याचा खुलासा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे काय म्हणाले?
गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात जो गोंधळ उडाला आहे, तो आपल्याला दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेनं आर्थिक सहाय्य न दिल्याने बेस्टची दरवाढ होणार आहे. सगळीकडे ही लूट चालू आहे. ज्या महत्त्वाच्या परीक्षा असतात, त्याबाबतीत देशभरात गोंधळ चालला आहे. परीक्षांचे पेपर लीक होण्याचं थांबलं नाही. देशभरात नीटचा गोंधळ सुरु आहे. तसा महाराष्ट्रातही एमएचसीईटीचा गोंधळ झालेला आहे. ही परीक्षा एव्हढी विचित्र झाली की, नक्की यांनी परीक्षा कोणासाठी दिली, पैसे कमावण्यासाठी ही परीक्षा आयोजीत केली होती की मुलांची तयारी काय आहे, हे पाहण्यासाठी केली होती? असा प्रश्न आहे.
पोलीस भरती सुरु आहे. पण पावसाळ्यात ही भरती का घेतली जात आहे? यासाठी पुण्यात आंदोलन सुरु आहे. निवडणुकीच्या तोंडावर गोंधळ घालत आहेत का? पोलीस भरतीसाठी साधारणपणे साडे सतरा हजार पदं आहेत आणि यासाठी १७ लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रातल्या नोकऱ्यांची परिस्थिती आपण पाहू शकता. महाराष्ट्रात शिक्षणानंतर नोकरी मिळवण्यासाठी किती खराब परिस्थिती झाली आहे, हे आता समोर आलं आहे. सीईटीमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला रिएक्झॅम नको, ही आमची मागणी आहे. या परीक्षा कशा घेतल्या आणि त्यानंतर गुण कसे दाखवण्यात आले, अशाप्रकारचा गोंधळ झाला आहे. महाराष्ट्रात सीईटीसेलने एक पेपर २४ बॅचेससाठी वेगवेगळे घेतले. त्यामध्ये वेगवेगळे प्रश्न होते.
अभ्यासक्रमाबाबत आधी कुणाला काही सांगितलं नव्हतं. त्या २४ पेपरसाठी वेगवेगळ्या बॅचेस बसल्यानंतर तुम्हाला हरकत घ्यायची असल्यास हजार रुपये लागतात. तुम्हाला वाटलं की, तुम्ही पेपरमध्ये चूक केली आहे. सीईटी सेलकडून काही चूक झाली, तर साधारणपणे हजार रुपये घेतात. पण या पेपरमध्ये १४२५ हरकती आल्या आहेत. एव्हढे पैसै सीईटी सेलने कमावले आहेत. यामध्ये २३२ युनिक ऑब्जेक्शन आयडी आहेत. सीईटी सेल आणि ज्यांनी पेपर सेट केला त्यांनी चूका काढल्या नाहीत. जो पेपर लिहिता, त्या पेपरमध्ये ५४ चूका आहेत. ज्यांनी या परीक्षांचे आयोजन केलं आहे, त्यांची आधी परीक्षा घेतली पाहिजे. त्यांची योग्यता तपासली पाहिजे.