निसार शेख|चिपळूण: तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीच्या रकमेमध्ये अपहार करणाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार शेखर यांनी माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना केलेला पत्रव्यवहार आता समोर आला आहे. शासनाच्या रकमेचा अपहार करणे हा गुन्हा असून याबाबत संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे शासन आदेश देखील यापूर्वीच निघालेले आहेत. पण केवळ शिस्तभंगाची कारवाई करून शिरगाव ग्रामपंचयातीतील अपहार करणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न आमदार शेखर निकम यांनी केला असल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
चिपळूण तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांनी पाणी पट्टी व घर पट्टीत वसुल केलेय रक्कमेमध्ये 1 लाख 43 हजार 69 रुपये सात महिने ग्रामपंचायतीकडे भरणा न करता स्वतःकडे ठेवले. ही गंभीर बाब माजी सरपंच सुधीर शिंदे यांनी गट विकास अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देऊन सखोल चौकशीचे निवेदनमार्फत मागणी केली. चौकशी अंती त्या तीन कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याचे समोर आले. त्यानंतर ग्रामसभा होऊन त्या तीन कर्मचाऱ्यांना पैसे भरण्यास सांगतीले. त्या तीन कर्मचाऱ्यांनी सात महिन्यानंतर अपहारीत रक्कम भरली पण 4 जानेवारी 2017 रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत आर्थिक व्यवहारात अनियमित करणे अथवा ग्रामपंचायत मालमत्ता निधीचा अपहार केल्यास त्याच्याविरोधात जो कोणी दोषी असेल त्याच्या विरोधात फ़ौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे असे आदेश पारित केले आहेत.
त्यानुसार रत्नागिरीचे उपमुख्य कार्यकारी अभियता यांनी विधी खात्याचे मार्गदर्शन नुसार आणि शासन निर्णय नुसार गट विकास अधिकारी यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे असे आदेश दिले. त्यानुसार गटविकास अधिकारी यांनी सरपंच यांना पत्र व्यवहार करून त्या तिघांवर शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात यावे असे आदेशाचे पत्र दिले. मात्र विद्यमान सरपंचानी गुन्हे दाखल न करता ग्रामसभेत ठराव घेऊन केवळ शिस्तभंगाची कारवाई केली. तसे पत्र रत्नागिरी जिल्हा परिषदेला पाठवले. त्यामध्ये त्या तींघावर केलेली कार्यवाही योग्य असल्याचा उल्लेख केला आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी त्याच पत्राचा आधार घेत शिरगाव ग्रामपंचायत मधील तीन कर्मचारी यांनी अपहारीत रक्कम भरणा केली आहे.
त्याचबरोबर ग्रामपंचायतीने दोषींवर शिस्तभंगाची केलेली कारवाई योग्य असल्यामुळे सदरचे आदेश रद्द होण्यासाठी आपणा कडून सबंधित यांना आदेश व्हावेत असे पत्र दि 25 ऑक्टोबर 2021 ला माजी मंत्री ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठविले. आमदार शेखर निकम यांनी शिरगाव येथील राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायतीला पाठीशी घालण्यासाठी असा प्रकार केला असल्याचे त्यांच्या पत्रावरून स्पष्ट होत आहे. जर लोक प्रतिनिधी शासनाच्या निर्णयाची पायमल्ली करत असतील तर रोजच्या रोज नवे शासन निर्णय काढले जातात ते नेमके कशासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे.