धनगर आरक्षणाचा मुद्दा सध्या जोर धरू लागला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यामागणीसाठी पंढरपुरात उपोषण सुरु आहे. या आंदोलना दरम्यान सरपंचाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. धनगर आरक्षणाची धग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. धनगर समाजाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहे.
पंढरपुरात आंदोलन करत असलेल्या उपोषणकर्त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत असल्याची शिष्टमंडळाने तक्रार केली आहे. आरक्षणासंबंधी सरकारने त्वरित निर्णय घेऊन तोडगा काढावा अशी विनंती शिष्टमंडळ करणार आहे.
थोड्या वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीला मंत्री शंभूराजे देसाई, धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांच्यासोबत इतर प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.