तामिळनाडूच्या उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर मिरा रोडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वादग्रस्त भाषणामुळे वाद निर्माण झाला आहे. उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे पत्र भाईंदर येथील विश्व हिंदू परिषदेच्या शिष्टमंडळाने 10 ऑगस्ट रोजी मीरा रोड पोलिसांना दिले होते. आयपीसी कलम 153 ए आणि 295 ए अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवल्याच पाहिजे. ज्याप्रमाणे आपण डेंग्यू, मलेरिया किंवा कोरोनाचा विरोध करू शकत नाही. त्याला संपवलच पाहिजे. सनातन धर्मालाही संपवायचं आहे. असे उदयनिधी स्टॅलिन म्हणाले होते. रात्री उशिरा मीरा रोड पोलिसांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरुद्ध कलम 153 अ आणि 295 अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सनातन धर्माला मानणाऱ्यांना संपवण्याची भाषा मी केली नाही. कायदेशीर गोष्टींना सामोरं जाण्यासाठी मी तयार आहे. असे उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटले आहे. विश्वहिंदू परिषदेचे भाईंदरचे पदाधिकारी रुपेश दुबे यांच्या तक्रारीनंतर उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.