किरण नाईक | नाशिक - हनुमान जन्मस्थळावरुन (Hanuman Birthplace) आता वाद चिघळताना दिसत आहे. अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळाचा वाद पेटलेला असतानाच यावर तोडगा काढण्यासाठी शास्रार्थ सभा आयोजित केली आहे. या सभेमध्ये अभूतपूर्व राडा झाला असून दोन्हीही बाजूच्या साधू-महंतांमध्ये हमरीतुमरी झाली. या वादाचे पर्यवसान टाळण्यासाठी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत महंतांना घटनास्थळावरून सुरक्षित स्थळी नेले.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळाचा वादावर तोडगा काढण्यासाठी स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे यांच्या महर्षी पंचायतन सिद्धपीठम् नाशिकरोड येथील आश्रमात हनुमान जन्मभूमीवर शास्त्रोक्त चर्चा आज आयोजित करण्यात आली होती. नाशिक त्र्यंबकेश्वरमधील साधू-महंतांनी कर्नाटक येथील किष्किंदा नगरीचे गोविंदानंद सरस्वती महाराज यांच्यावर रोष व्यक्त केला. यावर गोविंदानंद सरस्वती यांनीदेखील आक्रमक पावित्रा घेतल्यामुळे याठिकाणी मोठा तणाव झाला.
या सभेत बसण्याच्या जागेवरून वादास सुरुवात झाली. ते मानापमान नाट्य संपत नाही. तर पुन्हा वाद झाला आणि अगदी हात उगारण्यापर्यंत मजल गेली.
या धर्मशास्त्र सभेच्या अंती काय निर्णय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून असतानाच आज कुठलाही निर्णय हनुमानाच्या जन्मस्थळाबाबत झालेला नाही. तर नाशिकरोड परिसरात पार पडत असलेल्या शास्रार्थ सभेत साधू-महंत यांच्यात राडा झाल्याने पोलिसांनी महंतांना सभेतून बाहेर काढले. दरम्यान, घटनास्थळी तणावपूर्ण शांतता आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.