तंत्रज्ञानाच्या नव्या युगात भारत प्रवेश करत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजधानी दिल्लीमध्ये 5G सेवेचा शुभारंभ होणार आहे. उद्यापासून (शनिवार, 1 ऑक्टोबर 2022) भारतात सुपरफास्ट इंटरनेट सेवा सुरु होणार आहे.शुक्रवारी अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली. निवेदनानुसार, पंतप्रधान उद्या सकाळी 10 वाजता 13 निवडक शहरांमध्ये 5G सेवा लॉन्च करतील आणि पुढील काही वर्षांमध्ये हळूहळू देशभरात विस्तार केला जाईल. सोबतच पीएम मोदी इंडिया मोबाइल काँग्रेसच्या 6व्या आवृत्तीचे उद्घाटनही करणार आहेत.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑक्टोबर 2022 रोजी भारतात 5G सेवा लॉन्च करतील आणि 1-4 ऑक्टोबर 2022 या कालावधीत प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या इंडिया मोबाइल काँग्रेस 2022 च्या 6 व्या आवृत्तीचे उद्घाटन देखील करतील," असे निवेदनात म्हटले आहे.
या राज्यांना मिळणार फायदा
देशातील पहिल्या टप्प्यात अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे या 13 शहरांमध्ये 5G कनेक्टिव्हिटी सुरू केली जाईल.
सहाव्या भारतीय मोबाईल परिषदेचे उद्घाटन -
IMC “ नवे डिजीटल विश्व” या संकल्पनेसह 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान या भारतीय मोबाईल परिषद – 2022 चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून डिजिटल तंत्रज्ञानाच्या जलद स्वीकार आणि प्रसारामुळे उदयाला आलेल्या विशेष संधीबाबत चर्चा करण्यासाठी आणि त्या मांडण्यासाठी आघाडीचे विचारवंत, उद्योजक, नवोन्मेषी आणि सरकारी अधिकारी एका मंचावर येणार आहेत.