सतेज औंधकर, कोल्हापूर
कोल्हापूर विमानतळाच्या भूसंपादनासाठी निधीची गरज आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने कोल्हापूर विमानतळाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून, प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर येताच लोकहिताचे निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी, कोल्हापूर विमानतळाचे प्रश्न सुटण्यासाठी, केंद्र आणि राज्य स्तरावर पाठपुरावा केला आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्य शासनाने विमानतळाच्या भूसंपादनासाठी ५२ कोटी ७२ लाख ५७ हजार ५०० रूपयांचा निधी, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे वर्ग केला. त्याबद्दलचा शासकीय अध्यादेशही आज प्रसिध्द झाला.
शिंदे - फडणवीस सरकारने सत्तेवर येताच, कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी प्रत्यक्ष निधी देवून, क्रियाशिलता दाखवून दिली आहे. उच्च तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनीही हा निधी मिळण्यासाठी प्रयत्न केले. या सर्वांच्या प्रयत्नातून कोल्हापूर विमानतळाच्या भूसंपादनासाठी भरघोस निधी प्राप्त झाला आहे.दरम्यान ३ सप्टेंबर रोजी केंद्रीय विमान उड्डाण मंत्री जोतिरादित्य सिंदीया कोल्हापुरात येणार असून, कोल्हापूर विमानतळाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक घेतली जाणार आहे. त्यामुळे लवकरच कोल्हापूर विमानतळाच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल आणि हवाई सेवेला भरारी मिळेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.