Maharashtra Flood Update: राज्यात आज सकाळपासून मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळला. रायगडच्या सावित्री, उल्हास नदीला महापूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. तर कोल्हापूरमझ्ये पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या अतिवृष्टीमुळं राज्यात पाच जणांचा मृत्यू झाला. पुण्यात २, रायगड आणि साताऱ्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.
आज सकाळपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळं राज्यातील विविध भागात पूर सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगराला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. रायगडच्या माणगाव तालुक्यातील टेमपाले गावात राहणाऱ्या एका महिलेचा पूराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. नसरीन गोडमे असं मृत महिलेचं नाव आहे. नदीला आलेला पूर पाहण्यासाठी गेली असताना पाय घसरून नदीत पडल्यानं या महिलेचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती आहे.
तर सातारा जिल्ह्यातही कृष्णा नदीत महिला वाहून गेल्याची धक्कादायक घडली. ही महिला बोपर्डी येथील रहिवासी असून शिल्पा धनावडे असं तिचं नाव आहे. वाई तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. कृष्णा नदीच्या दिशेनं वाहणाऱ्या किवड्या ओढ्यात या महिलेचा पाय घसरला आणि ती पूरात वाहून गेली. या महिलेचा शोध सुरु असल्याची माहिती आहे.