छत्रपती शिवाजी महाराज यांचा 35 फुटांचा कोकणातील पुतळा कोसळल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. यामागचं कारण अजून कळू शकलेलं नाही. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात या पुतळ्याचं मोदींच्या हस्ते दिमाखात अनावरण पार पडलं होतं. नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जातात. भारतीय नौदलाने देखील आपल्या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा छापली आहे. या पार्श्वभूमीवर नौदलाच्या वतीने 4 डिसेंबर 2023 चा नौदल दिन छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान नौदलाने छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने 4 डिसेंबर 2023 नौदल दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी राजकोट किल्ल्यावर नौदल आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभरला होता. परंतु तो वर्षभराच्या आतच कोसळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ठाकरे गटाचे कोकणातील आमदार वैभव नाईक यांनी निकृष्ट कामामुळे छत्रपती शिवरायांचा हा पुतळा कोसळला असा आरोप केला आहे. दरम्यान, आता या घटनेचे राजकीय पडसाद राज्यभर उमटण्याची दाट शक्यता आहे.