ताज्या बातम्या

गणेश मंडळ कार्यकर्त्यांना व्यवसायासाठी पुनीत बालन ग्रुपकडून 3 कोटींच्या निधीची घोषणा

गणेश मंडळांचे आधारस्तंभ असलेले युवा उद्योजक पुनीत बालन यांनी गणेश मंडळ कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठीही आता पुढाकार घेतला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

चंद्रशेखर भांगे, पुणे

गणेश मंडळांचे आधारस्तंभ असलेले युवा उद्योजक पुनीत बालन यांनी गणेश मंडळ कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठीही आता पुढाकार घेतला आहे. पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी ३ कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा ग्रूपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी केली आहे. पुण्यातील सार्वजनिक गणपती मंडळाचे कार्यकर्ते आणि ढोल ताशा पथकातील वादक यांच्या वतीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीतदादा बालन यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. सारसबाग येथील श्री सिद्धिविनायक गणपतीची आरती त्यांच्या हस्ते झाली. त्यानंतर अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब थोरात आणि निंबाळकर तालीम मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते सुरेश पवार यांच्या शुभहस्ते कार्यकर्त्यांच्या वतीने पुनीतदादा बालन यांना मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करताना पुनीतदादा बालन म्हणाले, गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो. ज्याला काही काम धंदा नाही तो गणपती मंडळाचे काम करतो अशी सर्व साधारण लोकांची धारणा असते, तसेच हा कार्यकर्ता महिना दीड महिना आपल्या नोकरी धंद्याची परवा न करता बाप्पाचं काम तन मन लावून करत असतो. गणेश मंडळाचा कणा म्हणजे कार्यकर्ता तो टिकला पाहिजे, तो जगला पाहिजे त्याला समाजामध्ये सन्मान मिळाला पाहिजे आणि त्याच्याकडे आदराने पाहिलं पाहिजे या सर्व गोष्टींचा विचार करून कार्यकर्त्यांना व्यवसायासाठी पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून तीन कोटी रुपये आर्थिक मदत केली जाईल अशी घोषणा पुनीत दादा बालन यांनी केली. या निधीतून दरवर्षी 100 ते 300 कार्यकर्त्यांना मदत करण्यात येईल. प्रत्येक वर्षी मदतीमध्ये वाढ होईल असेही पुनीत दादा बालन यांनी स्पष्ट केले.

या निर्णयाचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून जोरदार स्वागत केले. रवींद्र माळवदकर, पराग ठाकूर, उदय जगताप, सूर्यकांत पाठक, धीरज घाटे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. श्री देवेदेवेश्वर सारसबाग संस्थेचे विश्वस्त रमेश भागवत,प्रसाद कुलकर्णी ,विकास पवार, हेमंत रासने ,दत्ता सागरे,अनिल सकपाळ, संजीव जावळे शिरीष मोहिते, सुरेश जैन ,पियुष शहा, आशुतोष देशपांडे तसेच बहुसंख्य गणेशोत्सव मंडळाचे ,जय गणेश व्यासपीठाचे कार्यकर्ते व ढोल ताशा पथकातील वादक उपस्थित होते.

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड