वर्धा | भूपेश बारंगे : वर्ध्यात लोक महाविद्यालयाच्या मैदानावर वाढदिवसाचा केक कापताना मध्यरात्री चित्रपटासारख्या थराररक पद्धतीनं एका तरुणाचा खून करण्यात आला. 24 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या तरुणाचा वाढदिवसाचा केक कापताना एकाचा खून करण्यात आला. शुल्लक कारणावरून चाकूने वार करीत खून करण्यात आला. रविवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुकाराम वार्डातील अक्षय सोनटक्के हा 23 वर्षाचा तरुण आपल्या मित्रांसह लोक महाविद्यालयाच्या मैदानात केक कापत होता. यादरम्यानच दुचाकीने आलेल्या काही तरुणांच्या गाडीचा कट लागला यावरून वाद निर्माण झाला. गाडीवरून आलेल्यांनी अक्षयला मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रकरण मारहाणीवरच थांबले नाही तर चाकूने सपासप वार करीत अक्षयला रक्तबंबाळ केलं. अक्षय सोनटक्केला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात पुलफैल येथील मयुर गिरी, ऋषी दिनेश बैरवार, निलेश मनोहर पटेल या तिघांसह पाच अल्पवयीन तरुणांच्या टोळक्यानं अक्षय ला मारहाण केल्याचे समोर आलं आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मुख्य आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. विधीसंघर्ष अल्पवयीन तरुणांकडून पोलीस माहिती घेत आहेत.
अलीकडे मध्यरात्रीच्या सुमारास मित्रांना सोबत घेणं आणि पार्टी करणं तसंच रस्त्यावर, मैदानात किंवा एखाद्या निर्जनस्थळी केक कापण्याचं फॅड तरुणांमध्ये वाढलं आहे. परंतु तरुणांच्या अशा बेभान वागण्याला पालकांकडून जरब असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आपला मुलगा मध्यरात्री कुठे जातोय काय करतोय, याकडेही आता लक्ष देण्याची जबाबदारी वाढली आहे. अशात पोलीस काय करतात हा सुद्धा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.
वर्ध्यात खुनाच्या घटनांमध्ये वाढ
वर्धा जिल्ह्यात खुनाच्या घटनेत वाढ झाली असून पोलीस प्रशासनावर आता प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हेगारी आळा घालण्यासाठी पोलिसांचे वचक राहिले नसल्याने शहरात गुन्हेगारी प्रमाण वाढत असताना चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. या पंधरवाड्यात ही तिसरी घटना आहे. वर्ध्यात क्षुल्लक कारणावरून हत्या होत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.गुन्हेगारील आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाई करण्याची गरज असल्याचे सर्वसामान्य चर्चा करताना दिसत आहे.