सुरज दाहाट | अमरावती: वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींना किंवा जखमी झालेल्या व्यक्तींना वनविभागाकडून शासनाची अल्प प्रमाणात मदत मिळत होती वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना आधी 15 लाख रुपये एवढी मदत मिळत असताना ती मदत कमी असून ती 15 लाखाहून 20 लाख रुपये करण्यात यावी अशी मागणी अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आ. प्रविण पोटे पाटील यांनी राज्यशासनाकडे केली होती.
राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दखल घेऊन वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास त्याचे परिवारास आता १५ लाखा ऐवजी २० लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. या बाबतचे आदेश वनमंत्रालयाकडून जारी करण्यात आले आहे. या बाबत माहिती स्वत: ना. सुधिर मुनगंटीवार यांनी माजी पालकमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील यांना पत्राद्वारे कळविली आहे.
कसं असेल मदतीचं स्वरूप?
जर कोणत्याही व्यक्तीचा वन्य प्राण्याने हल्ला केल्यास मृत्यू झाला तर त्याच्या परिवारास त्वरीत १० लाख रुपयाची मदत करण्यात येईल. तसेच उर्वरित १० लाख रुपयाची रक्कम त्याच्या संयुक्त बँक खात्यात फिक्स डिपॉसिटमध्ये जमा करण्यात येईल. जेणेकरुन मृतकाच्या परिवारास दरमहा व्याजाची रक्कम मदत मिळेल. तसेच, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात अपंगत्व आल्यास ५ लाख रुपये व गंभीर जखमी झाल्यास १.२५ लाख रुपयाची मदत देण्यात येईल.अशी माहिती माजी मंत्री व भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी दिली.