राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी आव्हाडांना अटक केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना कालची रात्र पोलीस स्टेशनमध्येच घालवावी लागली. त्यांनतर आज आव्हाड यांना जामीन मिळणार की तुरुंगात जावं लागणार यावर आज न्यायालयात सुनावणी झाली असून. आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच जितेंद्र आव्हाडांकडून जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र आव्हाडांच्या अटकेचं नेमकं प्रकरण काय?
हा सगळा वाद सुरू झाला ‘हर हर महादेव’ या चित्रपटामुळे. अभिनेता सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असलेल्या या चित्रपटामध्ये शरद केळकर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारतोय. याशिवाय इतरही अनेत दिग्गज कलाकार मंडळी या चित्रपटामध्ये आहेत. स्वराज्याचे एक वीर सरदार बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्यकथेचा पट चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यातील काही संवाद आणि चित्रपटातील काही दृष्य यांच्यावर सुरुवातीपासूनच आक्षेप घेण्यात आला होता. शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करून तो प्रेक्षकांसमोर मांडला जात असल्याचा दावा आक्षेप घेणाऱ्यांकडून करण्यात आला.