केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सोमवारी दिवसभरात 111 नव्या रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्याही 1634 वर पोहोचली आहे. त्याशिवाय, एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सोबत कोरोनाच्या नव्या व्हेरियंट रुग्ण सापडल्याने धोका वाढला आहे. गेल्या तीन वर्षांत राज्यातील कोरोनाच्या संसर्गामुळे मृतांची संख्या 72 हजार 53 इतकी झाली आहे. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून दक्षता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील सातत्यपूर्ण आणि सहयोगी कार्यामुळे, आम्ही (COVID-19) प्रकरणांची संख्या कमी करू शकलो. मात्र, कोविड-19 चा उद्रेक सुरूच आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी उपाययोजना आखणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यापूर्वी, तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील एका प्रवाशाला सिंगापूरमध्ये JN.1 प्रकाराची लागण झाल्याचे आढळून आले होते. केंद्र सरकारने सर्व राज्यांना त्यांच्या अखत्यारीत असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये कोविड-19 चाचणी मार्गदर्शक तत्त्वांनुसार पुरेशी चाचणी सुनिश्चित करण्यासाठी आणि RT-PCR आणि अॅण्टीजेन टेस्टचे प्रमाण कायम ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.