नवी दिल्ली : चांद्रयान-३ च्या यशानंतर इस्रो आता आपल्या पुढील मोहिमेच्या तयारीला लागले आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर भारत आता सूर्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. इस्रो 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11:50 वाजता आदित्य-L1 मिशन लाँच करणार आहे. या मिशनचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी इस्रो उद्यापासून रजिस्ट्रेशन विंडो उघडणार आहे. याबाबत इस्रोने ट्विटरवरुन माहिती दिली आहे.
आदित्य-L1चे प्रक्षेपण आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या स्पेसपोर्टवरून केले जाणार आहे. आदित्य एल-1 मोहिमेत इस्रो सूर्याचे तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, विशेषत: ओझोनचा थर, अवकाशातील हवामानाची गतिशीलता यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. आदित्य एल-1 ज्या ठिकाणी अंतराळात जाणार आहे ते ठिकाण पृथ्वीपासून 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. इस्रोच्या मते, आदित्य-L1 हे पूर्णतः स्वदेशी आहे.
अहमदाबादमधील इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश एम. देसाई यांनी सांगितले की, आदित्य-L1 यान लाँच करण्यास तयार आहे. 127 दिवसांत 1.5 दशलक्ष किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे हॅलो ऑर्बिटमध्ये तैनात केले जाईल. L1 बिंदू कुठे आहे. हा बिंदू सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये स्थित आहे. पण सूर्यापासून पृथ्वीच्या अंतराच्या तुलनेत ते फक्त 1 टक्के आहे. हे मिशन पीएसएलव्ही रॉकेटमधून प्रक्षेपित केले जाईल.
दरम्यान, भारत प्रथमच सूर्यावर संशोधन करणार आहे. पण आतापर्यंत एकूण २२ मोहिमा सूर्याकडे पाठवण्यात आल्या आहेत. ज्या देशांनी या मोहिमा पूर्ण केल्या आहेत त्यात अमेरिका, जर्मनी, युरोपियन स्पेस एजन्सीचा समावेश आहे. नासाने सर्वाधिक मोहिमा पाठवल्या आहेत.