भारत बायोटेकची नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला पुढील टप्प्यातील चाचणीस मंजुरी देण्यात आली आहे. तसेच जर या लसीच्या लसीकरणाला मान्यता मिळाल्यास भारतातील कोरोना संसर्ग आणखीन लवकर नियंत्रणात आणता येईल.
देशात लसीकरण मोहीमचा वेग आणखी वाढवण्याची गरज असतानाच आणखी एक स्वदेशी लस विकसित होत आहे. भारत बायोटेकची नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला पुढील टप्प्यातील चाचणीस मंजुरी देण्यात आली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने भारत बायोटेकेने विकसित केलेल्या नाकातून देण्यात येणाऱ्या लसीला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी दिली आहे. लस निर्मितीत बायोटेक्नॉलॉजी विभाग आणि त्याच्या पीएसयू बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल (बीआयआरएसी)ने मदत केली आहे. या लसीचं नाव बीबीव्ही१५४ असं आहे. ही इंटरनेझल म्हणजेच नाकावाटे देण्यात येणारी लस आहे. नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीच्या मदतीने लसीकरण आणखीन सोप्प्या पद्धतीने करता येणार आहे. या लसीमुळे लसीच्या कुप्या, इंजेक्शन, सुया यांचा खर्च वाचवणार आहे.
विशेष म्हणजे नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीमुळे विषाणू जिथून शरीरामध्ये प्रवेश करतो तिथेच ही नेजल व्हॅक्सिन परिणामकारक ठरणार आहे. म्हणजेच विषाणू नाकावाटे शरीरामध्ये प्रवेश करण्याआधीच थांबवण्याचे प्रयत्न या लसीच्या माध्यमातून केले जाणार आहे.