भारताने सोमवारी २० युट्यूब चॅनेल्स आणि दोन वेबसाईटवर बंदी घातली आहे. भारतविरोधी प्रचार करणारी ही चॅनेल्स आणि वेबसाईट्स पाकिस्तानमधून हाताळल्या जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. सुधारित माहिती तंत्रज्ञान कायद्यामधील बदलांनुसार हा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२१ मधील सुधारित आयटी नियमांचा पहिल्यांदाच वापर करत मोदी सरकारने हा मोठा निर्णय घेतल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय
माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी यूट्यूब आणि टेलिकॉम विभागाला पाठवलेल्या पत्रामध्ये देशाच्या एकतेला आणि सर्वभौमत्वाला धोका पोहचवणारा कंटेंट आणि अशा माध्यमांना तातडीने ब्लॉक करण्यात यावं असे आदेश दिले होते. या प्रकरणाशीसंबधित सुत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर हा खुलासा केला आहे.
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या सहकार्याने इंटरनेटवरुन भारताविरोधी प्रचारकी साहित्याचं प्रसारण केलं जात होतं. अशापद्धतीने चुकीची माहिती पसरवणाऱ्या गटांपैकी एका गटाचं नाव 'नया पाकिस्तान' असं असल्याचं माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय. या युट्यूब चॅनेलला दोन मिलियन सबस्क्रायबर आहेत. काश्मीर, शेतकरी आंदोलन, अयोध्या प्रकरण यासारख्या गोष्टींबद्दल या चॅनेलवरुन खोटी माहिती दिली जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. हेच कारण देत या चॅनेलवर बंदी घालण्याचे आदेश जारी करण्यात आलेत.