पुण्यात मनसेचा वर्धापनदिन सोहळा पार पडल्यानंतर मनसे आता आगामी निवडणूका लक्षात घेऊन चांगलीच तयारीला लागलेली पाहायला मिळतेय. राज्यभरात मनसेच्या नवनवीन शाखांचे उद्घाटन होताना दिसतंय तर अनेक उद्घाटन प्रसंगी स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहून कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवताना दिसतायत.
वर्धापनदिनी राज ठाकरे ह्यांनी भाषण करताना आजचं माझं भाषण हा केवळ एक ट्रेलर आहे, संपूर्ण चित्रपट गुढी पाडवा मेळाव्यात शिवतीर्थावर पाहायला मिळेल असं म्हटलं होतं. आता मुंबईतील वांद्रे येथील MIG येथे मनसेची बैठक पार पडणार आहे. ह्या बैठकीत गुढी पाडव्याच्या मेळाव्यासंदर्भात चर्चा होणार आहे अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
काय म्हणाले बाळा नांदगावकर:
"मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मनसे पदाधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीत आगामी निवडणूका, तिथी नुसार साजरी होणारी शिवजयंती आणि मनसेचा शिवतिर्थावर होणारा गुढीपाडवा या तिन्ही कार्यक्रमांची जोरदार तयारी करण्याच्या सुचना या वेळी देण्यात आल्या आहेत." असं बाळा नांदगावकर म्हणाले. तर, "राज्यात सध्या रोज नळावरची भांडण सुरू आहेत.यामुळे जनता आता राज ठाकरेंकडे मोठ्या आशेने बघतेय.पक्षाच्या वर्धापन दिनी राज ठाकरे नी ट्रेलर दाखवला आहे. पिक्चर २ एप्रिलला गुढी पाडवा मेळाव्यात दिसणार आहे." असंही ते म्हणाले.