प्रशांत जव्हेरी
अतिदुर्गम भागातील नर्मदा नदी परिसरात मानाची आदिवासी होळी व मेलादा उत्सव साजरा केला जातो. शुक्रवारी बिलगावात मेलादा उत्सव सुरु होता. या होळीत प्रमुख पाहुणे म्हणून नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर (medha patkar)उपस्थित होत्या. या कार्यक्रमदरम्यान मेधा पाटकर यांना अवैध धंदे सुरु असलेले दिसले. त्यांनी यासंदर्भात जाब विचारला असता, आम्ही पोलिसांना (police)हप्ते दिल्याचे अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांनी सांगितले. आता या प्रकरणात उच्चपदस्थांवर कारवाई होणार की छोटे मासेच सापडतील? यासंदर्भात चर्चा सुरु आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil)आता या प्रकरणात काय भूमिका घेता, याकडे लक्ष लागले आहे.
बिलगाव येथील होळीत कोणतेही गैरप्रकार किंवा अवैध धंदे सुरु असू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून तयारी करण्यात आली होती. गावाच्या पोलीस पाटलांसोबत बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांनी व्यवसाय सुरु ठेवले. त्यासाठी त्यांनी पोलिसांना हप्ते दिले. यामुळे दारू विक्री सुरुच होती.
नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर स्वत: बिलगाव येथे थांबल्या होत्या. त्यांनी रात्री गावात फिरुन अवैध धंद्येवाल्यांना तुम्ही दारू व जुगार मटके बंद करा, असे सांगितले. अवैध धंद्यावाल्यांनी आम्ही आजच पोलीस कर्मचार्यांना हप्ते दिले आहेत, असे मेधा पाटकर यांना सांगितले. त्यानंतर मेधा पाटकर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना बोलवून अवैध धंद्यावाल्यांचे पैसे परत करा, असे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दारु जप्त केली.
आठ वर्षांची मुले जुगार खेळत होते
माध्यमांशी बोलतांना मेधाताई यांनी सांगितले की, या ठिकाणी आठ-दहा वर्षांची मुलेही जुगार खेळत होती. घटनास्थळी पोलीस हजर असतांना काहीच करत नव्हते. शेवटी गावकऱ्यांनी आम्हाला साथ दिली. त्यानंतर आम्ही हे थांबवण्यास यशस्वी झालो.