देशाच्या पूर्व किनारपट्टीवर घोंगावणाऱ्या यास या चक्रीवादळासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
ओडिशातील धामरा बंदर परिसरात यास चक्रीवादळाचा लँडफॉल होणार आहे. तसेच याचा फटका पश्चिम बंगालच्या किनारी भागांना देखील बसणार आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झालेल्या ममता बॅनर्जी यांनी कंबर कसली आहे. मंगळवारी रात्रभर त्या नबाना येथील नियंत्रण कक्षातच ठाण मांडून बसणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
बुधवारी २६ मे रोजी सकाळी यास चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यांवर धडकणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आजची पूर्ण रात्र नबाना येथील मंत्रालयातील नियंत्रण कक्षातच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या सकाळी म्हणजे बुधवारी सकाळी यास चक्रीवादळ सुमारे १८५ किलोमीटर प्रतितास वेगाने ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यांवर धडकणार आहे. त्यादरम्यान, बचावकार्य आणि पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ममता बॅनर्जी रात्रभर नियंत्रण कक्षात थांबणार आहेत.