लोकशाही न्यूज नेटवर्क
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीनिमित्त आज (शनिवारी) पश्चिम बंगालमच्या कोलकात्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यात आल्या. त्यावर संतापलेल्या ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला खडसावले.
कोलकात्याच्या व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांना कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी बोलावण्यात आले. तेव्हा उपस्थितांमधील काही जणांनी 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या. त्यावरून ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त केला.
सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या हा कार्यक्रम होता. त्यामुळे याची प्रतिष्ठा राखणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. हा कुणा राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही. नेताजी यांच्या जयंतीनिमित्त कोलकातामध्ये कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पंतप्रधान तसेच सांस्कृतिक मंत्रालयाची मी आभारी आहे. पण कोणाला निमंत्रित करुन त्यांना अपमानित करणे, हे तुम्हाला शोभा देत नाही. याचा निषेध म्हणून मी काहीही बोलणार नाही, असे सांगत त्यांनी भाषण केले नाही.
रोड शोला जोरदार प्रतिसाद
पश्चिम बंगालमध्ये लवकरच निव़डणूक होणार आहे. त्यामुळे भाजपा तसेच ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये शक्तिप्रदर्शन केले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अलिकडचे पश्चिम बंगालचा दौरा करून शक्तिप्रदर्शन केले होते. तर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त ममता बॅनर्जी यांनी श्याम बाजार ते रेड रोडपर्यंत 9 किमी लांबीचा रोड शो आयोजित केला होता. या रोड शोला चांगला प्रतिसाद मिळाला.