महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग अधिक गडद होत चालला असून हा व्हायरस पुन्हा डोक वर काढू लागला आहे. गेल्या काही आठवड्यापासून 15 हजार ते 18 हजाराच्या आसपास आकडा गाठणाऱ्या रुग्णसंख्येने आज 20 ह्जाराचाही पल्ला ओलांडला. आज तब्बल 23 हजार 179 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य शासनासह आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. तसेच आता कोणत्याही क्षणी प्रशासन कठोर निर्बंध लावण्याची शक्यता आहे.
राज्यात कोरोना संसर्गाचा वेग आता अधिकच झपाट्याने वाढल्याचे दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असून, मृत्यूंची संख्या देखील वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात 23 हजार 179 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
आज नवीन 9 हजार 138 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यत एकूण 21 लाख 63 हजार 391 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या राज्यात एकूण 1 लाख 52 हजार 760 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 91.26% झाले आहे. राज्यातील रिकव्हरी रेट जरी नियंत्रणात असला तरी वाढती रुग्णसंख्या पुन्हा सरकारची डोकेदुखी बनण्याची शक्यता आहे.