चंद्रशेखर भांगे | पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवारची हत्या तिचाच मित्रा राहुल हंडोरे यांनी केल्याची घटना ताजी असतानाच आज पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
सदाशिव पेठेत एका तरुणीवर तिच्या मित्राकडून कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून शंतनू जाधव असे आरोपी मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव पेठेतील बादशाही हॉटेल चौक ते भरत नाट्य मंदिर या दरम्यान एक तरुणी तिच्या मित्रासोबत दुचाकीवरून जात होती. त्यावेळी त्या दोघांच्या मागून आरोपी शंतनू जाधव हा आला. आरोपी शंतनू याने तरुणी सोबत असलेल्या मित्रावर कोयत्याने वार केले. त्यानंतर त्या मुलीच्या मागे कोयता घेऊन धावत सुटला. त्यावर ती मुलगी आरडाओरड करीत असल्याचे एका मुलाला दिसले. व त्या मुलाने आरोपी शंतनू जाधव याला पकडले आणि नागरिकांच्या मदतीने आरोपीला पेरूगेट चौकीमध्ये पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
या हल्ल्यात तरुणी जखमी झाली आहे. तरुणी आणि आरोपी शंतनू जाधव हे दोघे मित्र होते. मात्र काही कारणास्तव त्या मुलींने आरोपीचा फोन नंबर ब्लॉक केला आणि ती त्याच्यासोबत बोलणे टाळत होती. या रागातून आरोपी शंतनू जाधव याने तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे विश्रामबाग पोलिसांनी सांगितले.