संजय राठोड, यवतमाळ | यवतमाळमधील नेर तालुक्यातील शिवसैनिक पावसामुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरल्याचे समोर आले आहे. तर, या प्रकारामुळे राज्यातील ठाकरे सरकारला या शिवसैनिकांकडून एकप्रकारे घरचा आहेरच दिला गेल्याचं बोललं जात आहे.
पावसाळ्यात आलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कपाशी, सोयाबीन, तूर, उडिद, मूग पिक हातातून गेले आहे. शेतकरी आधिच संकटात आहे. या नुकसानामुळे कर्जाचा बोजा आणखीच वाढणार आहे. कोरोना काळात शेतकर्यांना नुकसान सोसावे लागले. कर्ज, उसनवारी करून शेतकर्यांनी पेरणी केली. सुरुवातीला पीकपाणी चांगले होते. मात्र, पावसामुळे होत्याचे नव्हते झाले. राज्य सरकारने शेतकर्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन नेर तालुक्यातील शिवसेना तालुका प्रमुख मनोज नाल्हे, दीपक आडे यांनी मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांना जिल्हाधिकार्यांमार्फत पाठविले आहे.
तर, शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे. अशा घोषणा दिल्या. यावेळी त्यांच्या हाती मागण्यांचे फलक व झेंडे देखील होते.