चंद्रपूर :- शिक्षणनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रह्मपुरी शहरात आजपासून महिलांच्या महाराष्ट्र कुस्ती केसरीचा थरार बघायला मिळणार आहे. १२ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या राज्यभरातून ६०० महिला कुस्तीपटूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचे आयोजन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून जिल्हा व तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
१०, ११ व १२ डिसेंबर रोजी २५ वी वरिष्ठ महिला व ६ वी सब ज्युनिअर राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व २री महिला महाराष्ट्र केसरी किताब लढत अशा स्पर्धा बघायला मिळणार आहे. ब्रह्मपुरी शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगणावर भव्यदिव्य स्वरूपात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी ६ वाजता महिला केसरी कुस्ती स्पर्धेने होणार आहे. उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, तर अध्यक्षस्थानी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार राहतील. प्रमुख अतिथी म्हणून नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी, शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले, सलग दोनदा महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळविणारे शिवराज राक्षे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, नगराध्यक्ष रिता उराडे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक अध्यक्ष संतोषसिंह रावत, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश फुंड प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.