राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत 'सिल्व्हर ओक'वर बोलावलेली बैठक आता संपली आहे. या बैठकीत नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा की नाही यावर चर्चा झाली. दरम्यान आता नवाब मलिकांसंदर्भात शरद पवार नेमकी काय भूमिका घेणार याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी 'सिल्व्हर ओक'वर बैठक बोलावली होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे असे प्रमुख नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सुनील केदार हे देखील या बैठकीत उपस्थित होते.
नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर ते नैतिकतेच्या मुद्द्यावरुन राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशावेळी नवाब मलिक यांच्या ताब्यातील खातं कोणत्या मंत्र्याकडे देण्यात यावं याबाबत सिल्व्हर ओकवरील बैठकीत चर्चा झाली असावी अशी सुत्रांची माहिती आहे. मलिक यांच्याकडे खात्याचा अतिरिक्त पदभार मंत्री हसन मुश्रिफ, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील किंवा अन्य कोणत्या नेत्याकडे दिला जावा यावरही या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची तातडीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत नवाब मलिक प्रकरणी महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे. राष्ट्रवादी मात्र नवाब मलिक यांचा राजीनामा न घेण्याच्या प्राथमिक भूमिकेवर ठाम असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे.