अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे का केले? म्हणून जिल्ह्याधिकाऱ्यानी कृषी अधिकाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्त केल्याचे पत्र सध्या धुळे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे साक्री मतदार संघांच्या आमदार मंजुळा गावित यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या होत्या. त्यानंतर साक्री तालुका कृषी अधिकारी यांनी पिंपळनेर मंडळात पंचनामे केले.
महाविकास आघाडीचे सहयोगी आमदार गावित यांनी नुकसानग्रस्त पाहणीचा दौरा केला असतानाही, जिल्हा प्रशासन मात्र याठिकाणी काही नुकसान झाले नसल्याचा दावा करीत आहेत. पिंपळनेर भागात त्यादिवशी नुकसान करेल इतका पाऊस अथवा वादळ नसताना पंचनामे करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी जिल्हा कृषी अधीक्षकांनी नाराजी पत्र तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणे तर दूर, यापुढे ग्रामीण भागात नुकसानीचे पंचनामे होतील कि नाही? याबाबतही शंका उपस्थित होत आहे. या पत्रात जिल्ह्याधिकाऱ्यानी व्यक्त केलेल्या नाराजीचाही उल्लेख करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून असे नाराजी नाट्य घडत असेल तर लोकप्रतिनिधी काय करीत आहेत असा प्रश्न निर्माण होत आहे.