मुंबई : चीनसह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. कोविडच्या वाढत्या भीतीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार सज्ज झाले आहे. बुधवारी, नीती आयोगाने गर्दीच्या ठिकाणी लोकांना मास्क घालण्याच्या सूचना दिल्या. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख देवस्थानांनी मोठा निर्णय घेतला आहे. भक्तांनी दर्शनासाठी येताना मास्क वापरण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
भारतात ओमिक्रॉनच्या नवीन प्रकारांची चार प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर असून कोरोनाच्या चौथ्या लाटेसाठी सज्ज झाले आहे. अंबाबाई मंदिर, शिर्डी देवस्थान, दगडूशेठ मंदिर तसेच मुंबादेवी मंदिरात प्रशासनानेही मास्कसक्तीचा निर्णय घेतला आहे. देवस्थानांमधील कर्मचाऱ्यांना उद्यापासून मास्क सक्ती करण्यात आली आहे. तर, भाविकांनाही दर्शनासाठी मास्क, सॅनिटायझरचा करण्याचे आवाहन केले आहे.
तर, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थाननेही गणेशभक्तांनी दर्शनासाठी येताना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. मास्क वापरा, असा सूचना फलकाच लावण्यात आला आहे. तर, ज्या भाविकांकडे मास्क नाही त्यांना मंदिरात मास्क देण्यात येणार आहे. यासाठी मंदिर प्रशासनाकडून तातडीने गणेशभक्तासांठी ५ हजार मास्क खरेदी करण्यात येणार आहे.
दरम्यान, मागील 24 तासांत देशात 129 नवीन संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 3,408 आहे. तेथे एकाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. चीन, यूएसए, यूके, बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्क सारख्या युरोपियन देशांमध्ये BF.7 प्रकरणांवर सतर्कतेवर असल्याने विविध राज्ये त्यांचे स्वतःचे कोविड प्रोटोकॉल तयार करत आहेत.