संदीप गायकवाड | वसई-विरार : राज्यात उन्हाचा दाह वाढण्यास सुरुवात झाली आहे. अशात, वसई-विरार, नालासोपारा परिसरात पाण्याची टंचाईचा सामना करावा लागत आहे. आज चक्क पाण्याच्या बाटल्या मागवून पालिकेतील प्रशासनावर आपली तहान भागविण्याची वेळ आली आहे. यामुळे महापालिकेलाच पाणी विकत घ्यावं लागत असेल तर नागरिकांना पाणी मिळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मागील 10 ते 15 दिवसापासून पाण्याची टंचाई सामना वसई-विरारकर करत आहेत. पाण्याअभावी सर्वत्र नागरिक हैराण आहेत. नागरिकांना पाण्याअभावी होणारा नाहक त्रास लक्षात घेता पालिका प्रशासन मात्र समस्या सोडवण्यात अपयशी ठरत आहे. तर, वसई-विरार मधील पाणी टंचाईचा सामना पालिकेलाही करावा लागत आहे.
वसई-विरार महापालिकेच्या मुख्य कार्यालयातच आज सकाळी पाण्याच्या बाटल्या विकत आणल्याचे चित्र मुख्यप्रवेश द्वारावर दिसून आले आहे. आता तर महापालिकेलाच पाणी विकत घ्यावं लागत असल्याने वसई-विरार, नालासोपारा परिसरातील नागरिकांना पाणी मिळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नागरिकांच्या करातून पालिका पाणी विकत घेत आहे. मात्र, लोकांना पाण्यामुळे होणारा भुर्दंड कोण भरून देणार, असा प्रश्न विचारला जात आहे.