महाराष्ट्र

२७ गावांचा पाणीप्रश्न सुटणार ! जलकुंभांच्या योजनेला गती मिळणार

Published by : Lokshahi News

सुरेश काटे, कल्याण-डोंबिवली | कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांच्या पाण्याचा प्रलंबित प्रश्न लवकरच सुटणार आहे. अमृत अभियानातील १९० कोटींच्या योजनेत उभारण्यात येणाऱ्या जलकुंभांसाठी आवश्यक जागेसाठी ८० कोटी रूपयांचा खर्च येणार होता. त्याचा फटका योजनेला बसणार होता. त्याबाबत तोडगा काढण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे दिलासा देण्याची मागणी केली होती. याबाबत गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जागेसाठी लागणारा मोबदला माफ करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. लवकरच याबाबत निर्णय होईल, अशी आशा असून त्यामुळे २७ गावातील पाणी पुरवठा योजनेला गती मिळेल, असे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याच्या समस्येने तोंड वर काढले आहे. त्याबाबत कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी अमृत योजनेची घोषणा करण्यात आली. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या या योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या कामात विविध गावात जलकुंभांची उभारणी होणार आहे. या जलकुंभांच्या उभारणीसाठी जागेची आवश्यकता होती. शासनाच्या विविध विभागाच्या ताब्यात असलेल्या या जागेसाठी सुमारे ८० कोटींचा मोबदला द्यावा लागणार होता. सुमाके १९० कोटींच्या पाणी पुरवठा योजनेतील जर ८० कोटी रूपये जलकुंभांच्या जागेसाठी गेले तर त्याचा योजनेवर परिणाम होण्यीची भीती होती. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला. या जलकुंभांच्या जागेपोटी द्यावे लागणारे ८० कोटी रूपये माफ करावे अशी भूमिकी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली होती. त्याबाबत नुकतीच ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जलकुंभांच्या जागेसाठी लागलेल्या मोबदल्याची रक्कम माफ करण्याचा आग्रह ठेवला. पाणी पुरवठा योजना हे काम शासकीय काम असून त्यातून नागरिकांना दिलासा मिळणार आहे, अशीही भूमिका यावेळी डॉ. शिंदे यांनी मांडली. अखेर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनीही हा मोबदला माफ करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. लवकरच याबाबत अधिकृत निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे २७ गावातील पाणी पुरवठ्याच्या योजनेला गती मिळणार आहे.

अशी आहे योजना

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांत गेल्या काही दिवसात लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे पाण्याच्या मागणीतही वाढ झाली असून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यासाठी १९० कोटींची पाणी पुरवठा योजनेचे सध्या काम सुरू आहे. यात पाणी उचल केंद्र, पाणी पुरवठा केंद्र, जल शुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिन्या टाकण्याचे काम केले जाणार आहे. या योजनेसाठी उसरघर, नांदीवली, मानेरे, द्वारली, भोपर, कोळे, सांदप, निळजे आणि हेदुटने या गावात जलकुंभासाठी जागा मिळावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. तर आडीवली, भाल, उंबरोली आणि घेसर या ठिकाणी जागा उपलब्ध होणे बाकी आहे तरी सर्वेक्षण करून लवकर जागा निश्चिती करणे असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील या पाणी पुरवठा योजनेत जलकुंभ उभारणे गरजेचे आहे. यातील ९ ठिकाणच्या जागा शासनाच्या मालकीच्या असून त्यांचा मोबदला देणे खर्चिक ठरणार होते. त्यावर तोडगा काढण्यात आला आहे. इतर चार ठिकाणी जागेचा शोध सुरू आहे. योजना पूर्ण झाल्यास नागरिकांची पाणी समस्या सुटणार आहे. – डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा मतदारसंघ.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...