यंदा आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांचे लसीकरण करूनच त्यांना पंढरपुरात प्रवेश द्यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका पंढरपूरला बसला होता. यंदाही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने यावेळी गेल्यावर्षी प्रमाणे प्रातिनिधिक स्वरुपातच वारी करण्याची भूमिका पंढरपूरमधील नागरिकांची आहे. संतांचे मानाचे सातही पालखी सोहळे थांबत असलेले मठ हे प्रदक्षिणा मार्गावर असून शहराची सर्वात जास्त लोकसंख्या प्रदक्षिणा मार्गाच्या अंतर्गत भागात आहे. यामुळे पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांचे लसीकरण केल्यास अन्य नागरिकांना धोका कमी होईल, अशी स्थानिकांची भूमिका आहे.
अजूनही पंढरपूर मध्ये कोरोना आणि म्युकरमायकोसिस चे रोज नवनवीन रुग्ण सापडत आहेत. आत्तापर्यंत पंढरपुरात २४ हजार ७३१ कोरोनाचे रुग्ण सापडले असून सध्या ५५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे ४८० नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे ४१९ रुग्ण सापडले असून यात ३५ जणांचा मृत्यू झाला आहे.