भूपेश बारंगे | वर्धा : अकोला येथून नागपूर येथे पाण्यासाठी पायी येत असलेली यात्रा आज वर्धा जिल्ह्यातील कारंजा परिसरात पोहचली. या पदयात्रेचे भीषण वास्तव बघितले असता अंगावर शहारे आणणारी होती. या पदयात्रेत सहभागी झालेल्या अनेक नागरिकांच्या तळपायाला फोड आलेलं दिसून आले. यावरून पाण्याची किती भयंकर समस्या त्या परिसरात असेल हे यातून दिसून येत आहे.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदार संघातील 69 खेडी खारपाण पट्ट्यात क्षारयुक्त पाणी पिल्याने किडनीग्रस्त आजार नागरिक त्रस्त झाल्याने तेथील पाणी टँकरद्वारे संघर्षयात्रा काढून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तेच पाणी पाजणार, असे पदयात्रेकरू निर्धार केला आहे.
खारपाण पट्ट्यातील नागरिकांना पाण्यासाठी दोनदोन किलोमीटर पायपीट करावी लागते. तेही पाणी क्षारयुक्त मिळत असल्याने लहान मुलांना मुतखड्याचा आजार होतो. महिला पुरुषांना किडनीचे आजार झाले आहे. यात अनेकांना जीवही गमवावे लागले आहे, असे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले. यातून सुटका होण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खारपाण पट्ट्यातील पिण्याच्या पाण्यासाठी 219 कोटीची योजना मंजूर केली. या योजनेतून सव्वाशे कोटीचे काम करण्यात आले होते. तेवढ्यातच राज्यात सत्तातंरण झाल्याने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदापासून पायउतार व्हावे लागेल.
त्यानंतर शिंदे गट व भाजपची सत्ता राज्यात आल्यानंतर अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला स्थगिती दिली. यामुळे ही योजना पूर्णत्वास जाणार नसल्याने 69 खेडी मधून महिलांनी क्षारयुक्त पाणी जमा करून टँकर भरले व हे पाणी नागपूरला देवेंद्र फडणवीस यांना पाजण्यासाठी व आंघोळीसाठी पायी यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेत शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आहे. पायी चालताना अनेकांच्या तळपायाला 'फोड' आली आहेत. तरीही नागरिक पायी यात्रेत चालत आहे हे आश्चर्य आहे. यावरून पाण्याची किती दाहकता असेल हे दिसून येत आहे.
विदर्भात सध्या सूर्य आग ओकत असताना 43 डिग्री सेल्सिअस अंश तापमान सध्या आहे. यात ते पहाटे सहा वाजेपासून पुढील प्रवास करत आहे. काही अंतरावर पोहचताच मध्येच मुक्काम करण्यात येत आहे. ही पायदळ यात्रा 10 एप्रिल अकोला येथून निघाली असून नागपूरला 21 एप्रिलला पोहचणार आहे.
भविष्यातील पिढीला क्षारयुक्त पाणी पिऊ देणार नाही : आमदार नितीन देशमुख
पूर्वजांनी क्षारयुक्त पाणी पिले. मात्र, भविष्यातील पिढीला पिऊ देणार नाही. या परिसरातील पाण्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. अनेक जणांना किडणीग्रस्त आजार झाले आहे. यामुळे हे पाणी आता पुढच्या पिढीला पिऊ देणार नसल्याने ही योजना मंजूर करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना पाणी देण्यासाठी 'अकोला ते नागपूर' पिण्याच्या पाण्याची संघर्षयात्रा काढण्यात आली आहे.