अभिराज उबाळे, पंढरपूर | कार्तिकी वारीच्या निमित्ताने आज पासून 24 नोव्हेंबर पर्यंत विठ्ठल रुक्मिणीचे 24 तास दर्शन खुले करण्यात आले आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते आज विठ्ठलाचा पलंग काढून देवाला लोड देण्यात आला आहे. आज पासून ते प्रक्षाळ पूजा पर्यंत देवाची पहाटेची महापूजा, नैवेद्य आणि लिंबू पाणी वगळता इतर राजोपचार बंद राहणार आहेत.
15 नोव्हेंबर रोजी कार्तिकी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. सोहळ्याच्या निमित्ताने विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मंदिर समितीने दर्शन व्यवस्था केलेली आहे दर्शन रांगेसाठी मंदिर समितीने 10 पत्रा शेड उभे केले आहेत. कार्तिकी यात्रेसाठी किमान तीन ते चार लाख भाविक येतील यादृष्टीने दर्शन व्यवस्था केलेली आहे.दर्शन रांगेतील भाविकांना मंदिर समितीकडून मोफत मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.