कोरोनाबाधित भक्तांच्या मदतीसाठी आता पंढरपुरच्या विठूरायाने धाव घेतली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने आता 200 बेडचे कोविड सेंटर उभारण्यास मान्यता दिली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी दिली आहे. मंदिर समितीच्या या निर्णयानंतर कोरोना रुग्णांना मोठा दिलास मिळणार आहे.
पंढरपूर शहरात दररोज 200 हून अधिक रुग्ण सापडत असून, सध्या 1300 हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणाही तोकडी पडत चालली आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची बेडसाठी धावाधाव सुरु असून,वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या भीषण परिस्थितीत आता विठूराया धावून आला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने आपल्या दोन भक्त निवासामध्ये 200 बेडचे कोविड सेंटर सुरु करण्यास मान्यता दिली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी दिली. मंदिर समितीच्या या दिलासादायक निर्णयामुळे साक्षात विठुरायाच कोरोना रुग्णांच्या मदतीला धावून आल्याची भावना रुग्णांच्या नातेवाईकांना झाली आहे.