बीड : शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांचा अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे. तर, दुसरीकडे घातपाताचा संशय देखील व्यक्त केला जात होता. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चौकशीचे आदेश दिले आहेत. परंतु, 3 ऑगस्ट रोजी विनायक मेटेंच्या गाडीचा जवळपास २ किलोमीटरपर्यंत पाठलाग झाल्याचा दावा एका कार्यकर्त्याने केला आहे. यामुळे त्यावरून मेटेंच्या अपघातामागचं गूढ अधिकच वाढलं आहे.
पुण्याजवळ ३ ऑगस्ट रोजी दोन गाड्यांनी विनायक मेटेंच्या गाडीचा २ किलोमीटरपर्यंत पाठलाग केला होता. मी विनायक मेटेंना म्हणालो की थांबून बघू. पण ते म्हणाले जाऊ दे, प्यायलेले आहेत. आम्ही बैठकीसाठी बीडहून येत होतो. आमच्या गाडीच्या पुढे आयशर होती. मागून एक अर्टिगा कार कट मारत होती. त्यात तीन-चार लोक बसले होते. विनायक मेटेंची गाडी समाधान वाघमोडे चालवत होता, अशी माहिती शिवसंग्रामचे कार्यकर्ते अण्णासाहेब वायकर यांनी दिली. यामुळे विनायक मेटेंचा अपघात की घातपात ? संशय बळावला आहे.
तर, विनायक मेटे यांच्या अपघाता संदर्भातील कॉल रेकॉर्डींग समोर आल्यानंतर या संदर्भात विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, ही क्लीप मी आत्ताच ऐकली आहे. अण्णासाहेब वायकर यांच्याशी माझा देखील बोलणं झाल आहे. तीन ऑगस्टला असाच प्रकार घडल्याचे देखील अण्णासाहेब यांनी सांगितले. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे. मला देखील यामध्ये संशय वाटतो आहे. अपघातातील गाडी आणि तीन तारखेची गाडी याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि संपूर्ण प्रकाराची चौकशी करून न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे.
दरम्यान, विनायक मेटे अपघात प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मेटेंच्या अपघातावेळी ये-जा करणाऱ्या गाड्यांचाही आता शोध घेतला जाणार आहे. सोबत ड्रायव्हर, बॉडीगार्ड, मेटेंना कुणाचे फोन आले, हेही तपासण्यात येणार आहे. प्रवासादरम्यानच्या टोलनाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जाणार आहे. तर, मेटेंच्या ड्रायव्हरकडून तपासात समाधानकारक उत्तरं नाही, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे.