विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, खालच्या थरावर जाऊन एकमेकांवर चिखलफेक करण्याचे काम मागील एका आठवड्यापासून राज्याच्या राजकारणात पुन्हा सुरू झाले आहे.
आरोप, प्रत्यारोप आणि उणीदुणी सार्वजनिकरित्या काढून महायुतीतील सत्ताधारी नेते मुद्दाम नवीन वादाला तोंड फोडत आहे. ह्यात महाराष्ट्राच्या मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असून सत्ताधारी आपले डाव साधून घेत आहे. प्रत्येक शासकीय विभागात वाढलेला भ्रष्टाचार, रोज कोट्यवधी रुपयांचे शासन निर्णय काढून तिजोरीची सुरू असलेली लूट, वाढलेली कमिशनखोरी, शेतकऱ्यांच्या पिकाला न मिळालेला हमीभाव, महिलांवर होणारे हल्ले, बेरोजगारी हे सर्व प्रश्न दुर्लक्षित होत आहेत.
यासोबतच ते म्हणाले की, सत्ताधाऱ्यांचा हा तमाशा आपल्या राज्याच्या संस्कृतीला शोभून देखील दिसत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी नेहमी महाराष्ट्राला बदनाम करून महायुतीतील सत्ताधाऱ्यांनी नेहमीच स्वतःचा फायदा करून घेतला आहे. आता ही तोच डाव आहे ! असे विजय वडेट्टीवार म्हणाले.