विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, गडचिरोली लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाचा महायुतीने मोठा धसका घेतला आहे. अडीच वर्षांपासून सरकार चालवत असताना गडचिरोलीची आठवण यांना झाली नाही. आता निवडणुकीच्या आधी मतांसाठी विकासकामांचा दिखावा करण्यासाठी घाई सुरू झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील सूरजागड पोलाद प्रकल्पाचे बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी थाटात भूमिपूजन केले खरे, मात्र या प्रकल्पाला पर्यावरण विभागाची मंजुरी नसताना हे उद्घाटन करण्यात आले आहे. कोणताही प्रकल्प सुरू करण्यापूर्वी पर्यावरण विभागाची परवानगी तसेच जनसुनावणी घेणे आवश्यक आहे. असे असताना सुद्धा परवानगी आणि जनसुनावणी न घेताच या प्रकल्पाचे भूमिपूजन कसे आणि का करण्यात आले ?
यासोबतच ते म्हणाले की, निवडणुकीनंतर जर पर्यावरण विभागाने ही परवानगी नाकारली तर मग ही जबाबदारी कोण घेणार? की फक्त निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजनाचा दिखावा करून मतदारांची फसवणूक करण्याचा हा घाट आहे ? असे वडेट्टीवार म्हणाले.