मुंबई : विधान परिषद निवडणूक चांगलीच रंगताना दिसत आहे. मतमोजणीदरण्यान महाविकास आघाडीचे एक मत बाद झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांच्या कोट्यातील मत बाद झाले आहे. यामुळे आता भाजप व राष्ट्रवादीत खडाजंगी सुरु झाली आहे.
काँग्रेसने लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला होता. यावर निवडणुक आयोगाने आक्षेप फेटाळल्यानंतर तब्बल दोन तासांच्या विलंबाने मतमोजणी सुरु झाली होती. यानंतर सर्व आमदारांची 283 मते वैध असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, मतमोजणी सुरु झाल्यानंतर महाविकास आघाडीचे एक मत बाद झाल्याची समजत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांच्या कोट्यातील एक मत बाद झाले आहे. मतपात्रिकेत खाडाखोड केल्याने भाजप नेते आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला आहे. यानंतर एक मतपत्रिका बाजूला ठेवण्यात आली आहे. यामुळे आशिष शेलार आणि राष्ट्रवादीत खडाजंगी सुरु झाली आहे. यावर आता निवडणुक आयोगच्या निर्णयाची प्रतिक्षा केली जात आहे.
दरम्यान, रामराजे निंबाळकर यांचे एक मत बाद झाल्याने त्यांचा विजय धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसने 29 चा कोटा ठरवलेला असल्याने 28 मतं रामराजे निंबाळकर यांच्यासाठी आहेत. त्यामुळे अजूनही रामराजे सेफ झोनमध्येच आहेत.