मुंबई : मुंबईतील हिंदू जन आक्रोश मोर्चावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली होती. याच टीकेला शिंदे गट आमदार संजय गायकवाड यांनी राऊत हा एक रिकामटेकडा माणूस असे म्हणत प्रत्युत्तर दिले. यावर संजय राऊतांनी गायकवाडांवर पलटवार केला आहे.
लाठ्या मारा, त्यांना दंडूक्याने झोडपून काढा, असे शितल म्हात्रे म्हणाल्या होत्या. त्यांनी स्पष्ट करावे की ते का सोडून गेले त्यांनी महाविकास आघाडी नको म्हणून सोडून गेले. ते हिंदुत्वासाठी सोडून गेले, की खोके मिळाले म्हणून सोडून गेले. ते प्रत्येक वेळी भूमिका बदलतात. ते माझ्या ज्या भाषणाचा उल्लेख करतात हे माझे भाषण गुवाहाटीला गेल्यावरचे आहे. ते जरा व्यवस्थित ऐका. जे पळून गेले यांचा पार्श्वभाग सुजवून काढा, असे शितल म्हात्रे शिवसेनेत असताना म्हणाल्या होत्या. नंतर गुवाहाटीला जाऊन मिळाल्या, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे. संजय गायकवाड यांच्यासारख्या फालतू लोकांवर बोलायला मी बांधिल नाही, असा निशाणा त्यांनी साधला आहे.
तर, अर्थसंकल्पाबाबत संजय राऊत म्हणाले, आम्ही अदानीच्या विचाराने चालत नाही. आज देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. अर्थसंकल्प प्रत्येक वर्षी येतो. घोषणा खूप होत असतात. इतकीच अपेक्षा आहे की दोन-पाच जणांना पुढे ठेवून हा अर्थसंकल्प तयार होवू नये. सर्वसामान्यांना डोळ्यापुढे ठेवून बनवला तर स्वागत असेल. नाही तर राहूल गांधी म्हणतात तसे दोघांसाठी ही अर्थव्यवस्था राबवली जात असेल तर हा देश खड्यात जाईल आणि जात आहे, अशी टीका त्यांनी मोदी सरकारवर केली.
काय म्हणाले होते संजय गायकवाड?
संजय राऊत हा एक रिकामटेकडा माणूस आहे. त्याच्याकडे कुठलेही काम नाहीये. मराठा समाजाच्या निघालेल्या लाखोंच्या मोर्चाला सुद्धा त्याने मुक्काम मोर्चा म्हणून टिंगल केली होती. सध्या राज्यात आणि देशांमध्ये जे हिंदू जन आक्रोश मोर्चे निघत आहेत, ते गोमातेच्या रक्षणासाठी आहेत. आतंकवाद्यांच्या सांगण्यावरून आपल्या देशामध्ये लव्ह जिहाद हैदोस घालतो आहे. त्याविरोधात धर्मांतर बंदी कायदा आणण्यासाठी हे मोर्चे निघत आहेत. अनेक राज्यांनी हा कायदा लागू केला आहे. संपूर्ण देशात हा कायदा लागू करण्यात यावा. हा कायदा आपल्या हिताचा आहे. अशा मोर्चांवर टिंगल टवाळी करणं म्हणजे त्या हिंदुत्ववादी पक्षामध्ये काम करणाऱ्या संजय राऊतांची दिवाळखोरी निघाल्याचे दिसत आहे, अशी टीका गायकवाडांनी केली होती.