लसीकरणाचे प्रमाण वाढू लागल्यानंतर लोकल प्रवासाची मागणी वाढू लागली होती. अखेर रेल्वे प्रशासनाने 10 महिन्यानंतर सामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास सुरू केला. कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली होती. मात्र, युटीएस अॅपमधून तिकिट बुकिंग करण्याची मुभा देण्यात आली नव्हती. अखेर युटीएस अॅप हे महाराष्ट्र सरकारच्या युनिर्व्हसल पास पोर्टलशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे युटीएस अॅपमधून तिकिट घेताना संबंधित प्रवाशाचे लसीकरण झाले असल्याची खातरजमा होणार आहे.
तिकीट खरेदी करण्यासाठी प्रवाशांना तिकीट काउंटरवर युनिव्हर्सल पास दाखवावा लागतो. आता युनिव्हर्सल पास जारी करणारे राज्य सरकारचे पोर्टल रेल्वेच्या यूटीएस मोबाइल ॲपशी जोडले गेले आहे. या ॲपद्वारे प्रवासी तिकीट आणि मासिक तिकीट दोन्ही जारी केले जाऊ शकतात. मासिक तिकिटांचे नूतनीकरण देखील शक्य आहे. तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना काउंटरवर जाण्याची गरज नाही. ही सुविधा प्रवाशांसाठी दिनांक २४ नोव्हेंबरपासून अँड्रॉइड गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध होईल.ज्या प्रवाशांनी यापूर्वीच युटीएस मोबाइल अॅप डाउनलोड केले आहे. त्यांना ही नवीन युटिलिटी सक्रिय करण्यासाठी अॅप अपडेट करावे लागेल.