सुप्रीम कोर्टाने कोरोनामुळे 2020 मध्ये यूपीएससीची परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. गेल्यावर्षी परीक्षा न देऊ शकल्यामुळे आणखी एक संधी मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळली.
कोरोना काळात शाळा, कॉलेज अशा सर्वच परीक्षा एक तर पुढे तरी ढकलण्यात आल्या किंवा ऑनलाईन तरी घेण्यात आल्या. मात्र, लॉकडाऊनच्या काळात स्पर्धा परीक्षा नियोजित वेळापत्रकापेक्षाही उशिरा म्हणजेच ऑक्टोबर २०२०मध्ये घेण्यात आल्या या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालायात याचिका दाखल केली होती. त्यामुळे, ज्या विद्यार्थ्यांना २०२१ची UPSC पूर्वपरीक्षा उत्तीर्ण करता आली नाही, त्यांना ठरलेल्या संधींपेक्षा एक अतिरिक्त संधी मिळावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत ही याचिका फेटाळून लावली.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्या. इंदू मल्होत्रा आणि न्या. अजय रस्तोगी यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने ही याचिका एकमताने फेटाळून लावली आहे. याआधी देखील जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अशा प्रकारे शेवटची संधी उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एक अतिरिक्त संधी देता येणार नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने मांडली आहे.