आमदार जयंत आसगावकर यांच्या कार्यालयाच्या दारात विनाअनुदानित शिक्षकांनी बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे. राज्यातील सर्व अघोषित, घोषित , त्रुटी अपात्र आणि अंशतः अनुदानित 20 टक्के व 40 टक्के शिक्षकांना शंभर टक्के प्रचलित सूत्रानुसार अनुदान मिळावं आणि सर्व विनाअनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षण मिळावं या मागणीसाठी पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांच्या नागाळा पार्क येथील कार्यालयासमोर विनाअनुदानित शिक्षकांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिलेला शब्द पाळावा असं आवाहन विनाअनुदानित शिक्षकांचे नेते खंडेराव जगदाळे यांनी केलं आहे. जवळपास 100 पेक्षा अधिक विनाअनुदानित शिक्षक या धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत.
राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांच्या गेल्या वीस वर्षापासून प्रलंबित मागण्या पूर्ण होऊन आता तरी त्यांची वेठबिगारी थांबवावी यासाठी राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांनी आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या नागाळा पार्क इथल्या कार्यालयाच्या दारात बेमुदत आंदोलन सुरू केल आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा असल्याचा इशारा खंडेराव जगदाळे यांनी दिला आहे.