महाराष्ट्र

उल्हासनगर महापालिकेतील सत्ताधारीच डम्पिंगविरोधात रस्त्यावर

Published by : Lokshahi News

मयुरेश जाधव | उल्हासनगरातील कॅम्प ५ भागात असलेल्या डम्पिंगच्या विरोधात शिवसेनेनं आज रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केलं. विशेष म्हणजे उल्हासनगर महापालिकेवर शिवसेनेचीच सत्ता असूनही शिवसेनेला रस्त्यात बसून आंदोलन करण्याची वेळ आली.

उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील आकाश कॉलनी परिसरात एका बंद पडलेल्या खदानीत उल्हासनगर महापालिकेनं तात्पुरत्या स्वरूपात डम्पिंग सुरू केलं आहे. या डम्पिंगचा स्थानिकांना मोठा त्रास होतो. कचऱ्याच्या सतत जाणाऱ्या गाड्या, त्यातून सांडत असलेला कचरा, पावसाळ्यात होणारा चिखल, त्यासोबत डम्पिंगमधून वाहून येणारा कचरा या सगळ्यामुळे या भागातले नागरिक त्रासले आहेत.

दुसरीकडे उल्हासनगर महापालिकेला मलंगगड पट्ट्यातील उसाटणे गावाजवळ ३० एकर जागा डम्पिंगसाठी मोफत देण्यात आली. मात्र तिथे डम्पिंग न उभारता अजूनही शहरातलं डम्पिंग सुरू ठेवल्याबद्दल शिवसेनेनं महापालिका प्रशासनाचा निषेध केला. याविरोधात आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार बालाजी किणीकर, महापौर लिलाबाई आशान यांच्यासह शिवसेनेचे सगळे पदाधिकारी डम्पिंगच्या परिसरात रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करायला बसले.महापालिकेनं उसाटणे डम्पिंग बाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही कचऱ्याची एकही गाडी पुढे जाऊ देणार नाही, असा इशारा यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिला.

विशेष म्हणजे उल्हासनगर महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे, ज्या भागात हे डम्पिंग आहे तिथे शिवसनेचे आमदार आहेत, खासदारही शिवसेनेचे आहेत, पालकमंत्री आणि मुख्यमंत्री हे देखील शिवसेनेचेच आहेत. शिवाय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच नगरविकास खातं सुद्धा आहे. तरी सुद्धा आयुक्त ऐकत नसल्यानं शिवसेनेला आंदोलन करावं लागणं, हा विनोद म्हणावा की शोकांतिका, अशी चर्चा शहरात रंगली आहे.

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव