मुसळधार पावसामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर आला. याचसोबत भूस्खलनाच्या घटनांमुळे राज्यभरात आतापर्यंत जवळपास ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. रायगडच्या तळीये गावात दरड कोसळल्याने ४०हून अधिक ग्रामस्थांचा मृत्यू झालाय. या ठिकाणी अद्याप बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुर्घटनाग्रस्त भागाला भेट दिली. घडलेल्या दुर्घटना पाहता सरकारकडून पुनर्वसन आराखडा आणि जल मॅनेजमेंट करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
निसर्ग कोपात आक्रीत घडलं, हे पाहिल्यानंतर, डोंगरदऱ्यातील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार आराखडा तयार करेल. वेधशाळा अंदाज व्यक्त करते, पण त्याचं प्रमाण आणि परिणाम कुणालाही सांगता येत नाही, असं त्यांनी म्हटलं. कालपासून सातारा, सांगली, कोल्हापूर भागात खूप तणाव होता. नद्यांचं पाणी शहरात शिरलं आहे, ते पाहता नद्यांच्या वाहत्या पाण्यासाठी वॉटर मॅनेजमेंटचाही आराखडा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री महाड तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त तळीये गावात दाखल झाले आहेत. दरड कोसळलेल्या ठिकाणी ते पाहणी करत असून त्यांच्याबरोबर मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री आदिती तटकरे तसेच खासदार सुनिल तटकरे हे देखील उपस्थित आहेत.