कोरोनाच्या संक्रमणामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने मोठी घोषणा केली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अशा विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत सर्व शैक्षणिक शुल्क माफ करण्याची घोषणा केली आहे.
अनुदानित महाविद्यालय व विद्यापीठीय विभागातील सर्व अभ्यासक्रमांसाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन/उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगझिन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिव्हल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च आकारण्यात आलेला नाही. त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.
प्रयोगशाळा व ग्रंथालय यांची देखभाल व ग्रंथालयामध्ये ई-कन्टेंट विकत घेण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याने याबाबतच्या शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येईल. विद्यार्थ्यांद्वारे वसतीगृहाचा उपयोग केला जात नसल्याने वसतीगृह शुल्कापोटी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येईल, असे सामंत म्हणाले.