एटापल्ली तालुक्यातील हेडरी उपविभागात येणाऱ्या गट्टा (जांभिया) पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील जंगलात बुधवारी सकाळी उडालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. त्यांची ओळख पटली असून, दोघांवर मिळून ८ लाखांचे बक्षीस शासनाने ठेवले होते.
पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील आणि पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सायंकाळी या घटनेची सविस्तर माहिती दिली. नक्षलविरोधी अभियान राबविणारे सी-६० पथकाचे जवान जंगलात दबा धरून बसलेल्या २० ते २५ नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलीस जवानांनीही गोळीबार केला. यानंतर नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. त्या परिसरात शोधमोहीम सुरू असताना दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले.